Saturday 26 March 2016

माझ्या डायरीतून...


nondee.blogspot.com  

अंतर्मुख क्षणी वेळोवेळी हाती आलेल्या उत्कट समजूतीच्या काही नोंदी... अल्पायुषी का असेनात पण यांनी मला पुनर्जन्माचा आनंद दिलाय.

मनोगत-

घड्याळाचे तीनही काटे
बारावर असण्याचा हा क्षण
३१ डिसेंबरच्या रात्रीचा आहे.
माझ्या शेजारी रेडिओ लागलेला आहे.
निवेदिका नववर्षाच्या शुभेच्छा देतेय.
बाहेर जल्लोष चाललाय...
फटाक्यांचे छाती धसकवणारे आवाज
आणि खिडक्यांच्या काचेवर आदळून परतणारा प्रकाश
रात्रीला झोपू देत नाहीए.

पाठ दुखतेय.
वेदना हळू हळू हातातही पसरतेय.
माझे चित्त विखुरलेय या सार्‍यात.
उडालेल्या फटाक्यांच्या कागदासारखे.
पाठ दुखतेय... जास्तीच.
पण मन घोटाळले नाही
पाठीच्या आगेमागे तर दुखणं राहील
दुखण्याच्या मर्यादित आकाराएवढं...!

भोवतीच्या या गलक्यातही
चित्तात उमटतेय व्याख्या मुक्त क्षणाची...
पण ती व्याख्या शब्दात टिपण्याच्या नादात
अनुभूतीची चव मी घेतली की नाही
आता आठवत नाहीए...!

जगण्याची समज वाढवणारे
असे किती पुनर्जन्म
मुरत राहतात आतल्या आत
आपल्या नकळत..!
त्यांना नसतो नवा देह
नसते वेगळे नाव.. वेगळी ओळख..
आणि नसते आयुष्यही..!  

***  



No comments:

Post a Comment